बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर द्वारा संचलित धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर,जि:- लातूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिकचा 22 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सामान्य(शासकीय) रुग्णालय,उदगीरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार हे उपस्थित होते.तर व्यासपीठावर डॉ.बालाजी कट्टेवार,डॉ.वैभव बिरादार, डॉ.नामदेव बनसोडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठ गीत सादर करुन ध्वजवंदन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना डॉ.दत्तात्रय पवार म्हणाले की कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या विविध चिकित्सापद्धतीचे पदवी व पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी विविध संसर्गजन्य आजार सोबतच वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत राहणे ही काळाची गरज असून त्याचा लाभ समाजाचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी निश्चितपणे होईल.


या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.दत्तात्रय वि.पाटील म्हणाले की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिकचे आरोग्य क्षेत्रात अत्यंत मोलाचे व अतुलनीय योगदान आहे.अन्न-वस्त्र-निवारा या प्रत्येक व्यक्तीच्या व कुटुंबाच्या मूलभूत गरजा म्हणून गणल्या जातात त्याचप्रमाणे आता आरोग्यसेवा सुद्धा मूलभूत गरजा अंतर्गत घेऊन त्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे.समाजातील प्रत्येक घटकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी, दक्षता व खबरदारी घेतानाच समाजाचे आरोग्य संतुलन टिकवून ठेवण्यासाठी कार्य केल्यास त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान सहज टाळता येऊ शकेल व पर्यायाने त्याचा राष्ट्रीय विकास दरांमध्ये वाढ होण्यासाठी लाभ होऊ शकेल.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ प्रशांत बिरादार यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय गुडसूरकर यांनी केले.
याप्रसंगी धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाचे व सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तथा आंतरवासियता प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.